Home Breaking News चंद्रपूरहून घरी येताना काळाचा घाला

चंद्रपूरहून घरी येताना काळाचा घाला

◆ मारेगावात शोककळा
◆ तरुणाचा जागीच मृत्यू

वणी वृत्तवेध:–मारेगाव मार्गावरील निंबाळा रोड मंगळवारी रात्री भीषण अपघाताने हादरला. दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन मारेगाव येथील सचिन जगन देवाळकर (वय ३७) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून, घटनेमुळे संपूर्ण मारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन देवाळकर हे मूळचे मारेगावचे रहिवासी असून चंद्रपूर येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री ते आपल्या चारचाकी वाहनाने मारेगावकडे येत असताना निंबाळा रोडवर काळाने त्यांच्यावर झडप घातली.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाशी भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, कारचा पुढील भाग अक्षरशः चुराडा झाला. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने सचिन देवाळकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनातून सचिन यांना बाहेर काढून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

सचिन देवाळकर हे मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे परिचित होते. अवघ्या ३७ व्या वर्षी त्यांचे असे अचानक जाणे अनेकांना चटका लावून गेले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे देवाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.

Previous articleतलाठी व मंडळ अधिकाऱ्याची अटकपूर्व जामिनासाठी धाव
Next articleशहराच्या सभोवताल ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे