Home Business कामगार ते उद्योजक: राजाभाऊ बिलोरिया

कामगार ते उद्योजक: राजाभाऊ बिलोरिया

◆ कथा एका प्रेरणादायी प्रवासाची

वणी वृत्तवेध :- शहरातील एका साध्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. राजाभाऊ बिलोरिया… नाव साधं, पण कर्तृत्व असामान्य. आयुष्याने वारंवार कठीण प्रसंग उभे केले, पण त्यांनी प्रत्येक वेळी जिद्दीने त्यावर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

लहानपणीच आयुष्याने त्यांची कसोटी पाहायला सुरुवात केली. वडील गणपतराव बिलोरिया हे नगरपालिकेत नोकरीला होते, पण मोठं कुटुंब आणि मर्यादित उत्पन्न यामुळे घरात नेहमीच आर्थिक ताण होता. सात भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजाभाऊंना लहान वयातच जबाबदारीची जाणीव झाली. दहावीपर्यंत शिक्षण घेत असतानाच वडिलांचे निधन झाले आणि अचानक संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.

या टप्प्यावर अनेकजण खचले असते, पण राजाभाऊंनी हार मानली नाही. त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचे काम पत्करले. सोबतच पहाटे लवकर उठून शहरात सायकलीने ब्रेड विक्री करत घर चालवण्याचा प्रयत्न केला. दिवस रात्र मेहनत करत असतानाच त्यांच्या मनात एक विचार सतत डोकावत होता—“काहीतरी वेगळं करायचं.”

याच विचारातून त्यांनी इलेक्ट्रिक काम शिकण्याचा निर्णय घेतला. मग शहरातीलच एका ईलेक्ट्रीकल दूकानात अर्थाजनाबरोबरच काम शिकणे सुरु केले.कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कोणताही आधार नसताना त्यांनी मेहनतीच्या जोरावर हे कौशल्य आत्मसात केलं. मग सायकलवरून गावोगावी फिरत त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या पंपांची दुरुस्ती सुरु केली.

उन्हात, पावसात, कष्टाची पर्वा न करता त्यांनी सुरू केलेल काम त्यांना भविष्याची दीशा दाखवित गेलं.तेथूनच त्यांना कष्टाचे फळ मिळायला सुरुवात झाली. मग त्यांनी वणी शहरात राम मंदिराजवळ स्वतःचे इलेक्ट्रिकल दुकान सुरू केले. कामातील प्रामाणिकपणा, विश्वास आणि कौशल्य यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. हळूहळू त्यांना नगर पालिका आणि महावितरणची कंत्राटे मिळू लागली आणि त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली. इथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

एमआयडीसी परिसरात त्यांनी वीज वितरणासाठी लागणारे साहित्य आणि सिमेंट पोल तयार करण्याचा कारखाना उभारला. त्यांच्या या उद्योगामुळे शेकडो कामगारांना रोजगार मिळाला. स्वतः कामगार म्हणून सुरुवात केलेल्या राजाभाऊंनी इतरांसाठी रोजगार निर्माण करणारा उद्योजक होण्याचा मान मिळवला.

स्वताचे शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी मनात ठेवली नाही, तर ती आपल्या मुलांच्या यशातून भरून काढली. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षीत झाली.मोठा मुलगा सचिन व्यवसायात त्यांना हातभार लावत आहे, तर लहान मुलगा विजयने अभीयांत्रीकीची पदवी घेऊन पुढे एम.टेक आणि एमबीएपर्यंत मजल मारली,हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई असल्याचे ते सांगतात.

व्यवसायात यशाचे शिखर गाठतानाच त्यांनी समाजाशी नाळ जोडण्याचा ध्यास घेतला. वणी शहर हिरवे करण्याचा संकल्प करुन त्यांनी शहरात शेकडो झाडे लावून ती वाढविली. पर्यावरणाबद्दलची त्यांची जाणीव शहरात कौतुकपात्र ठरली. त्याचबरोबर त्यांनी संगीताची आवड जपत संगीत साधना मंडळाच्या माध्यमातून अनेक नामवंत गायकांचे कार्यक्रम वणीत आयोजित करुन वणीकरांना संगीताची मेजवानी दीली.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उद्योग, समाजसेवा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम दिसतो. राजाभाऊ बिलोरिया यांचा प्रवास आपल्याला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. परिस्थिती कितीही कठीण असली, अडचणी कितीही मोठ्या असल्या, तरी जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर यश मिळवणे अशक्य नाही.

ही फक्त एक यशोगाथा नाही, तर संघर्षातून उभं राहण्याची, स्वप्नांना सत्यात उतरवण्याची आणि इतरांसाठी प्रेरणा बनण्याची कहाणी आहे.

Previous articleमहाराष्ट्र दिनी ‘वणी वृत्तवेध’चा शुभारंभ
Next articleकामगारांच्या घामावर देशाची अर्थव्यवस्था
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे