◆ पुतळ्या’वरून मोठा वाद
◆दोन गुन्हे दाखल
वणी वृत्तवेध:– शहरातील मार्डी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा मध्यरात्री विना परवानगी स्थापन केल्याने मारेगावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी विना परवानगी पुतळा बसवणे, रास्ता रोखो करणे, गाव बंद चे आवाहन करणे,जमावबंदीचा आदेश झुगारल्याने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून मात्र किती जणांवर गुन्हा दाखल झाला याची माहिती मिळू शकली नाही परिसरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दि. १ मेच्या मध्यरात्री काही शिवप्रेमींनी शहराच्या मुख्य महामार्गावरील मार्डी चौकात पुतळा उभारला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला, त्या ठिकाणाच्या अगदी समोर पोलीस ठाणे असूनही ही घटना प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळी हा प्रकार उघडकीस येताच प्रशासनात खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुतळा हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवप्रेमींनी जोरदार विरोध करत वातावरण तापवले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन वणी, शिरपूर, मुकुटबन, पांढरकवडा व यवतमाळ येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि दंगा पथक पाचारण करण्यात आले.


उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, प्रभारी मुख्याधिकारी सचिन गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी आणि वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणत पुतळा हटविण्याची कारवाई केली.
या कारवाईनंतर काही संतप्त शिवप्रेमींनी महामार्गावर चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.दरम्यान, आमदार संजय देरकर आणि मनसे नेते राजू उंबरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढा वा घेतला व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या प्रकरणी विना परवानगी पुतळा स्थापन केल्याबद्दल दोन वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे
विना परवानगी सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसविणे हा कायद्याचा भंग आहे.नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य टाळावे व प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच पुतळा उभारावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.








