◆ महसूल प्रशासन दुर्लक्ष ?
◆ रेती साठ्यांच्या चौकशीची मागणी
वणी वृत्तवेध :तालुक्यातील रेती घाटांची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या बाजारात रेतीला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक घाटधारकांनी रेती साठवणुकीवर भर दिल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील विविध लेआऊटमधील मोकळ्या जागा, रस्त्यालगतचे परिसर तसेच शहराबाहेरील ठिकाणी रेतीचे मोठमोठे ढिगारे उभे राहत असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, रेती घाट बंद झाल्यानंतर कृत्रिम टंचाई निर्माण करून हीच रेती चढ्या दराने विकली जाते, असा आरोप वारंवार होत असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरबांधणीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. शासनाच्या नियमांना हरताळ फासत अनेक ठिकाणी अवैधरीत्या रेती साठवली जात असल्याची चर्चा असून संबंधित विभाग मात्र मौन बाळगून आहे.

रेती साठवणुकीसाठी परवानगी घेण्यात आली आहे का, साठ्याची नोंद महसूल विभागाकडे आहे का, तसेच रॉयल्टी भरली आहे का याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात आणि शहराबाहेर सुरू असलेल्या या रेती साठेबाजीमागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. महसूल प्रशासनाने तातडीने संयुक्त पथक तयार करून तपास मोहीम राबवावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात रेतीचा काळाबाजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.










