महाकाली यात्रेकरीता मनपाने उभारली यात्रा नगरी
चंद्रपूर – देवी महाकाली यात्रेस उद्या 3 एप्रिलपासून सुरवात होत असतांना राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व चंद्रपूर मनपा प्रशासनाद्वारे तयारी पुर्ण करण्यात आली असुन महाकाली मंदिर परिसराला यात्रा नगरीचे स्वरूप आले आहे.
प्रशासनाद्वारे महाकाली मंदिरासमोरून बैल बाजार परिसरात जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद असल्याने स्वस्तिक ग्लास फॅक्टरी जवळुन माता महाकाली नगरीपर्यंत मोठा मार्ग बनविण्यात आला आहे. बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई व सपाटीकरण करून याच भागात भाविकांना निवासासाठी 4 मोठे मांडव उभारण्यात आले आहे तसेच मंदिर संस्थेची निवास व्यवस्था व सशुल्क निवास व्यवस्था सुद्धा यात्रा मैदानात उपलब्ध आहे. भाविकांना पिण्यासाठी 12 ठिकाणी 2 हजार लिटरची क्षमता असलेल्या 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असुन भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येत आहे. भाविकांना त्यांची वाहने ठेवण्यास त्यांच्या येण्याच्या मार्गापासुन जवळ असेल असे 5 वाहन तळ निश्चित करण्यात आले आहेत.
यात्रा मैदान येथे व मनपा स्वच्छता झोन इमारत अश्या 2 जागी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असुन यात्रा मैदान येथे 33 पक्के शौचालय तर 5 ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.मनपा स्वच्छता झोन इमारत व यात्रा मैदान नियंत्रण कक्षाजवळ निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात विदयुत व्यवस्था उभारली गेली असुन वादळ,वारा,पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या शाळा व इतर ठिकाणे मिळुन 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ट्रॅफीक पोलीस विभागातर्फे अंचलेश्वर दरवाजा ते बागला चौक परीसर हा नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला असल्याने येथे वाहने व दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.यात्रा परीसरावर विविध ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीस विभाग लक्ष ठेऊन असणार आहे.
कपडे बदलण्यासाठी एकूण 40 खोल्यांची व्यवस्था झरपट नदी,अंचलेश्वर गेट जवळ करण्यात आली असुन जवळचे आंघोळीसाठी खोल्यांची व्यवस्थाही आहे. दुकानदार,पथविक्रेते,बर्फीविक्रेते यांच्यासाठी सुद्धा यात्रा मैदानात दुकाने निश्चित करून दिली असुन मनोरंजनाची दुकाने सुद्धा उपलब्ध असणार आहेत. तसेच चहाच्या दुकानांसाठी मैदानात मंदिर संस्थेच्या निवास व्यवस्थेजवळ जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यात्रेकरू महिलांसाठी हिरकणी कक्ष यात्रा मैदान (नियंत्रण कक्षा लगत) उभारण्यात आले असुन मदतीसाठी दुरध्वनी क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. प्रशासनाद्वारे दिल्या जात असणाऱ्या या सर्व सुविधांची माहिती ही पत्रकाद्वारे देण्यात आली असुन सदर पत्रके सर्व यात्रा परिसरातील सेवा केंद्रांवर उपलब्ध आहेत.







