Home Entrainment लग्नाचा खर्च टाळून बांधले शिवार रस्ते, चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमी...

लग्नाचा खर्च टाळून बांधले शिवार रस्ते, चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा, नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा दिला आहेर .

0
100

चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा २८ एप्रिल २०२५ ला पार पाडला. या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवाने गावातील शिवार रस्ते बांधले. नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर दिला. सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला. नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण एमएसस्सी पर्यंत झाले आहे. ते परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा त्यांची फक्त एकच अट होती. ती म्हणजे लग्न हे नोंदणी पद्धतीने किंवा सत्यशोधक पद्धतीने करायला मुलगी आणि कुटुंब तयार असावे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतिशील आणि कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्या मध्यस्थीने हा योग जुळून आणला. सुरेश गरमडे यांनी प्रस्ताव मुलगी अंजलीच्या वडिलांकडे ठेवला तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला. घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला. लग्नात कोणताही अवाढ्यव्य खर्च करायचा नाही. हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे हे दोन्ही कुटुंबाचे ठरले.

पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होती. शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही. म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये- जा करता येणार आहे.

सत्यशोधक विवाह सोहळा असल्याने आहेर पद्धत ठेवायची नव्हती. सृजनशील श्रीकांतने सर्व नातेवाईकांसमोर फळझाडे भेटवस्तू स्वरूपात देण्यास सांगितले. नातेवाईक आणि मित्रांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत तब्बल ९० पेक्षा जास्त फडझाडे भेट दिली. यामध्ये स्टारफ्रूट, वॉटर एप्पल, चकोत्रा, मलबेरी, लिची, रबर, अशा फडझाडांचा समावेश आहे. सोबतच पावसाळ्यामध्ये विविध वेली, रानभाज्या, औषधी वनस्पती यांची लागवड करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी श्रीकांतच्या शेतामध्ये १६०० स्क्वेअर मीटरचे एक फुट फॉरेस्टच निर्माण होणार आहे. या लग्नाची पंचक्रोशीत सकारात्मक चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here