Chandrapur
Chandataknews
चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर –
भद्रावती येथील शुभांगी राहुल धकाते यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून एम.आय. लाईफ स्टाईल ग्लोबल कंपनीकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात आवाज उठविला असून, कंपनीने त्यांचे ९ लाख ५० हजार रुपये तात्काळ परत करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शुभांगी धकाते मागील आठ वर्षांपासून एम.आय. लाईफ स्टाईल ग्लोबल कंपनीत अभिकर्ता म्हणून कार्यरत होत्या. ही कंपनी आरोग्यविषयक उत्पादने व खतांचा व्यवसाय करणारी खाजगी कंपनी आहे. सुरुवातीच्या काळात शुभांगी यांनी कंपनीच्या उत्पादनांचे मार्केटिंग करून स्वतःच्या मेहनतीवर चांगला व्यवसाय उभारला. त्यांच्या उद्योगशीलतेचा परिणाम म्हणून नागपूर येथील कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यांना प्रॉडक्ट विक्रीसाठी स्वतंत्र शॉपी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला.
या शॉपीसाठी १४ लाख ५० हजार रुपये कंपनीकडे जमा करण्याची अट ठेवण्यात आली. शुभांगींकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापकांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून कर्ज स्वरूपात ती रक्कम उभी केली. शुभांगी यांनी कंपनीवर विश्वास ठेवून संपूर्ण रक्कम जमा केली तसेच आवश्यक कागदपत्रे – बँक खात्याचा तपशील, कौटुंबिक माहिती – कंपनीकडे सादर केली.परंतु पूर्ण रक्कम भरल्यानंतर सुद्धा शुभांगी यांना १४ लाख ५० हजारांच्या मालाऐवजी केवळ ८ लाख रुपयांचेच प्रॉडक्ट देण्यात आले. उर्वरित ६ लाख ५० हजारांचा माल न दिल्यामुळे शुभांगी यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र कंपनीकडून “माल उपलब्ध नाही” असे कारण देत विलंब करण्यात आला.
याशिवाय त्यांच्या व्यवसायाशी निगडित कमिशनची रक्कम शुभांगी यांच्या आयडीवर जमा न होता व्यवस्थापकांच्या आयडीवर जात असल्याचा धकाते यांचा आरोप आहे. सततच्या मागणीनंतरही शुभांगी यांच्या खात्यात योग्य ते कमीशन जमा झाले नाही. विक्री झालेल्या मालावर ठरलेले दोन टक्के कमीशनही देण्यात आले नाही. मालाची पुनर्पुरवठा करण्यासही कंपनीने नकार दिल्यामुळे शुभांगींच्या दुकानातील बाकीचा माल विकला जाऊ शकला नाही.
या सर्व घटनांनंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुभांगींचे पती यांना नागपूरला बोलावून ५ लाख रुपयांचा धनादेश दिला आणि त्यानंतर पैसे मागायचे नाही असे धमकावून सांगितल्याचा आरोप शुभांगी धकाते यांनी केला आहे. सध्या त्यांना फक्त ५ लाख रुपये परत मिळाले असून, उर्वरित रक्कम कंपनीने अद्याप परत केलेले नाहीत. शुभांगी धकाते यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. कंपनीकडून लवकरात लवकर थकबाकीची रक्कम परत मिळावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.








