चंद्रपूर जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नियोजन भवन येथे ‘गुंतवणूक शिखर परिषद अॅडवांटेज चंद्रपूर 2025’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी बल्लारशाह मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, नागपूरचे उद्योग संचालक गजेंद्र भारती, महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या संमेलनाच्या माध्यमातून चंद्रपूरने विक्रमी 17,431 कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे. देशभरातील 12 नामवंत कंपन्यांमार्फत स्टील, माइनिंग, बायोफ्युएल, रेल्वे, डिफेन्स, केमिकल यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे 14,100 थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.






