चंद्रपूर जिल्ह्यात माजी पालकमंत्री व भाजपचे दिग्गज नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार चंद्रपूरचे किशोर जोरगेवार यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. शहरातील रामबाग मैदान वाचविण्यासाठी सध्या आंदोलने सुरू आहेत. रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने आज महापंचायत घेऊन जनआंदोलनाचा निर्धार केला. याच मुद्द्यावर चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपच्या दोन आमदारांनी दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. यात जिल्हाधिकाऱ्यांची मात्र पळापळ झाली. केवळ एकाच भिंतीचे अंतर ठेवत माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडू -सामाजिक संस्था- राजकीय कार्यकर्ते यांच्यासह जिल्हाधिकारी कक्षात स्वतंत्र बैठक घेतली. त्यात त्यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. कक्षाच्या बाजूला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी जंगी बैठक आयोजित करत या प्रश्न पुढाकार घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्याला आधी बैठकीसाठी वेळ न दिल्याबद्दल नाराजी ही व्यक्त केली. बैठकीअंती इथले बांधकाम थांबवत असलंयाचा निर्णय देखील दिला. माध्यमांपुढे बोलताना मात्र दोन्ही आमदार यांनी यात श्रेय नव्हे तर लोकोपयोगी कामे व्हावीत यासाठीची भावना महत्त्वाची असल्याचे बळेबळेच सांगितले.








