Home Breaking News Chandrapur….चंद्रपूरात अंधांच्या बौद्ध धम्म संमेलनाला सुरुवात

Chandrapur….चंद्रपूरात अंधांच्या बौद्ध धम्म संमेलनाला सुरुवात

0
45

Chandrapur

Chandataknews

चंद्रपूर (प्रतिनिधी):
दि. बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक या संस्थेच्या वतीने चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर अंध व्यक्तींसाठी दोन दिवसीय बौद्ध धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १ आणि रविवार, २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाची आज सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. राज्यभरातून सुमारे १०० ते १५० अंध बांधवांनी यात सहभाग नोंदवला असून चंद्रपूरात अशा स्वरूपाचे हे पहिलेच संमेलन आहे.

संमेलनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव अशोक घोटेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष चेतन उंदिरवाडे, संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर सवाणे आणि राजेश गायकवाड उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून बौद्ध महासभेचे सचिव संदीप सोनवणे व कोषाध्यक्ष गुरु मेश्राम यांची उपस्थिती लाभली.

धम्म संमेलन आठ सत्रांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या दिवशीच्या सत्रात ‘बौद्ध धम्मातील पूजा व साहित्याचे महत्त्व’ या विषयावर कृष्णाक पेरकवार यांनी भाष्य केले. त्यानंतर ‘बौद्ध सण व मंगलदिन’ या विषयावर संगीता अलोणे यांनी विचार मांडले. पुढील सत्रांमध्ये ‘बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी धम्म’, ‘राष्ट्रनिर्माण—भान आणि भूमिका’ तसेच ‘बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये’ या विषयांवर अनुक्रमे डॉ. राजेश आसुधानी, धनराज लोखंडे आणि सपना कुंभारे हे विचार मांडणार आहेत. दिवसाच्या अखेरीस ‘भीम बौद्ध गीते’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात ‘भैय्यासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य’ या विषयावर किशोर तेलतुंबडे, तर ‘बुद्धाचा धम्म हाच कल्याणकारी धम्म आहे’ या विषयावर मोहन देठे मांडणी करतील. तिसऱ्या सत्रात ‘स्त्रियांच्या उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर मंदाकिनी दुधे विचार मांडतील. समारोपीय सत्रात किशोर तेलतुंबडे, संगीता घोडेस्वार, डॉ. इसादास भडके, डॉ. रवी मुरमाडे, राजेश मडावी आणि निवृत्त पोलिस अधिकारी पठाण यांची उपस्थिती राहील.

या दोन दिवसीय संमेलनासाठी जिल्ह्यातील अंध व्यक्ती उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष सतिश निकम, राजाराम गायकवाड, स्थानिक आयोजक सतिश शेंडे, किशोर तेलतुंबडे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा—चंद्रपूर पश्चिम विभाग), दिलीप गेडाम, भारत पचारे, अशोक घोडेस्वार, विकास शेजवड आणि शेषराव सहारे यांनी परिश्रम घेतले आहेत.

या उपक्रमाद्वारे अंध बांधवांमध्ये बौद्ध धम्माची जाण वाढवून सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here