वणी वृत्तवेध : सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या रेसर बाईक्स उपलब्ध झाल्यामुळे युवकांमध्ये वेगाची आणि स्टाईलची क्रेझ वाढताना दिसत आहे. लाखोंच्या किंमतीच्या या बाईक्स पालक आपल्या मुलांच्या हौसेपोटी खरेदी करून देत आहेत. मात्र, याच गोष्टीमुळे शहरात भरधाव बाईकर्सचा धोका वाढताना दिसत आहे
कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना दुचाकी चालविण्यास मनाई आहे. अल्पवयीन मुलांच्या हातून अपघात झाल्यास पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तरीही अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली बिनधास्तपणे दुचाकी चालवताना आढळून येत आहेत.
याशिवाय, तरुणांमध्ये सोशल मीडियासाठी ‘रील’ बनविण्याचे फॅड वाढले आहे. निर्जन ठिकाणी जाऊन धोकादायक स्टंटबाजी करत व्हिडिओ तयार केले जात आहेत. काही बाईकर्सकडून बाईकमध्ये कर्कश आवाज करणारे सायलन्सर बसवून रात्रीच्या वेळी वेगाने गाडी चालवली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वरोरा मार्गावर असे प्रकार वारंवार दिसून येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे.
या भरधाव बाईकर्समुळे पायी चालणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही अशा निष्काळजीपणामुळे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करून वाहन तपासणी, व दंडात्मक कारवाई केली जात आहे.मात्र अपुरे पोलीसबळ व सामाजिक व राजकीय हस्तक्षेपा मुळे अनेकदा वाहतूक पोलिसांना माघार घ्यावी लागते.
सुरक्षित वाहतूक ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्याला वाहन देतांना होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव ठेवणे काळाची गरज बनली आहे.








