Chandrapur…
Chandataknews 
चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण २२ डिसेंबरला, सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या २८० कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण २२ डिसेंबर २०२५ रोजी सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
माजी अर्थमंत्री व माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून टाटा ट्रस्ट, राज्य शासन आणि जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार झाला. २०१८ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने या रुग्णालयाच्या स्थापनेचा निर्णय घेतला होता.
१४० बेड क्षमतेचे हे अत्याधुनिक रुग्णालय तळमजला आणि चार मजल्यांमध्ये उभारले असून अत्याधुनिक कॅन्सर निदान, उपचार आणि सर्जरीसाठी आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. दोन लिनीअर अक्सेलरेटर्स, ब्रेकीथेरपी, सीटी सिम्युलेटर, मॅमोग्राफी, डिजिटल एक्स-रे तसेच सूक्ष्मजीवशास्त्र, रक्तविज्ञान आणि हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा यांचा समावेश आहे.
आ. मुनगंटीवार यांनी माजी टाटा समूहप्रमुख रतन टाटा यांच्याशी चर्चेदरम्यान या रुग्णालयाचे लोकार्पण मोहनजी भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती, आणि आता ती साकार होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास आ. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झाला असून या कॅन्सर हॉस्पिटलमुळे पूर्वविदर्भातील आरोग्यसेवेला नवा आयाम मिळणार आहे.








